Friday, December 24, 2010

ऐहिक आणि ऐतिहासिक ‘धनुषकोडी’… भाग-१

image

       जितकं गूढ तितकंच रम्य, जितकं भकास तितकंच सुंदर, जितकं उदास तितकंच उत्साही... वीज, रस्ते, टुमदार घरं असं ‘ऐश्वर्य’ काहीच नसल्यानं केवळ अशा विरोधाभासांनीच सजलेलं 'धनुषकोडी'. रामेश्वरमपासून धनुषकोडीकडे जाणाऱ्या अंदाजे २० किमी. डांबरी रस्त्याच्या दुतर्फा दिसतील ती फक्त बाभळीची काटेरी झुडूपं, पिवळट-पांढरी वाळू किंवा निळाशार समुद्र. रामेश्वरमहून वाट वाकडी करून इथे येणारे फार कमी लोक असतात कारण धनुषकोडीला काय आहे असं विचारताच, 'कूछ नही है, सब उजाड, बंजर, रेत है|' असं उत्तर मिळण्याची शक्यता जास्त असते.धनुषकोडीला सहसा 'Ghost Town' म्हणूनच ओळखल्या जातं! 

       धनुषकोडीला उतरताच समोर दिसते ती भारतीय नौदलाची चेकपोस्ट. तिथल्या एका खांबावर दिमाखात लावलेली ट्यूबलाईट नजरेस पडते. इथून पुढे धनुषकोडी गाव, कन्याकुमारी सारखंच भारताचं शेवटचं टोक आणि बंगालचा उपसागर-हिंदी महासागर यांचा संगम पाहण्यासाठी जवळच उभ्या असलेल्या मिनी ट्रक्स ची मदत घ्यावी लागते. माणशी ५०-१००रु. 'season' नुसार आकारले जातात, यात जाणं-येणं दोन्ही आलं. आम्ही धनुषकोडीला गेलो तेव्हा महाशिवरात्री नुकतीच होऊन गेल्यामुळे रामेश्वरमची बरीच गर्दी इथे आलेली होती त्यामुळे ट्रक मिळणं आणि तो प्रवाशांनी भरणं यात जास्त वेळ गेला नाही. 'भरणं' म्हणजे काय ते खालील फोटोवरून कळेल...
Picture 122 [1024x768]

       स्वतःची गाडी असली तरीही या ट्रक्स आणि त्यांच्या ड्रायव्हर्सवर विश्वास ठेवणे चांगले. पुढील प्रवासात याची कल्पना येतेच. २०-२५ मिनिटांचा हा प्रवास वाळू आणि समुद्राच्या पाण्यातून होतो! रस्ता, पायवाट या गोष्टी समुद्राने कधीच पुसून टाकल्यात. समुद्राच्या भरती, आहोटीच्या वेळापत्रकानुसार हा 'तथाकथित' रस्ताही बदलतो! या प्रवासासंबंधी तीन बाबींची मी खात्री देतो-
१. पाणी पिण्यासाठी बाटली उघडलीत तर पाणी तोंडात पडण्याऐवजी बाजूला खेटून बसलेल्या प्रवाशाच्या अंगावर   पडणार!
२. पाठ अखडली असेल तर मोकळी होणार!
३. हा प्रवास एक अविस्मरणीय अनुभव असणार!
 
    

       खारट पाण्याचे शिंतोडे अंगावर घेत, दोन्ही बाजूला अथांग समुद्र मधून चिंचोळा वाळूचा भूभाग, तोही बर्‍याचदा पाण्याखाली असा आमचा प्रवास एकदाचा संपला. ट्रक थांबला. खाली उतरून पाहतो तर तिन्ही बाजूंनी निळाशार समुद्र! डावीकडे बंगालचा उपसागर आणि उजवीकडे हिंदी महासागर. संगमाची नेमकी जागा, पाण्याचा बदललेला रंग दिसतोय का ते शोधक नजरेने पाहायचा व्यर्थ प्रयत्न करून पाहिला परंतू ते अगदी बेमालूमपणे एकमेकांत मिसळून गेले होते, त्यांचं स्वतंत्र अस्तित्व त्यांच्या एकत्र येण्यात अडसर ठरलं नाही. समुद्र अगदी शांत आणि स्वच्छ होता. गर्दी फारशी नसल्यामुळे किना‌र्‍यावर कागदी कपटे, प्लॅस्टिकच्या बाटल्या असा कुठलाही कचरा आढळला नाही. सूर्य मावळतीकडे कलला होता, आम्ही भारताच्या शेवटच्या टोकावर उभे होतो, इथेच कधीतरी राम, लक्ष्मण, हनुमान, इतर वानरसेना जमली असेल, त्यांनी लंकेला जाण्याबद्दल चर्चा केली असेल, सेतू बांधायला सुरूवात केली असेल... आपणही आज त्याठिकाणी उभे आहोत हे पाहून मन शहारुन आलं. इथून श्रीलंका फक्त ३१ किमी अंतरावर आहे, भौगोलिक द्द्ष्ट्या हे भारत आणि लंकेमधलं सर्वांत कमी अंतर आहे. रात्री तिथले लाईट्स दिसतात अशीही माहिती कोणीतरी पुरवली. तमिळ भाषेबाबत आनंदच असल्याने परत जायची वेळ झालीये हे ड्रायव्हरच्या सांगण्यापेक्षा त्याच्या ट्रककडे जाण्याने कळाले…  आता ट्रकने वेग घेतला होता. मावळतीचं आकाश तांबड्या-केशरी रंगांनी भरून गेलं होतं. वारा भन्नाट सुटला होता. हा ’रस्ता’ वेगळा भासत होता कारण आता सगळीकडे वाळूच दिसत होती. समुद्रापासून आम्ही लांब आलो होतो. ट्रक परत थांबला. वाळूची छोटीशी चढण उतरताच एक पडकं चर्च दिसलं, त्याच्याबाजूलाच जुनाट उध्वस्त झालेली इमारत उभी होती.

 
"भिंत खचली, कलथून खांब गेला,  
जुनी पडकी उध्वस्त धर्मशाळा"


       बालकवींच्या ओळी त्या जागेला तंतोतंत लागू पडत होत्या. आजूबाजूला बाभळीची झुडूपे उगवलेली होती. त्यांचा एकूण विस्तार पाहता गेल्या कित्येक वर्षांत त्यांच्या वाटेला कुणी गेलेलं नाही हे स्पष्ट जाणवत होतं. काही घरांचे अवशेष शिल्लक होते. सार्‍या वातावरणात एक प्रकारची हुरहुर जाणवत होती. मावळतीचे रंग आता अधिकच गडद झाले होते. त्या संध्याकाळी पहिल्यांदाच ’कातरवेळ’ अनुभवत होतो. अस्वस्थ पण हवीहवीशी वाटणारी. आम्ही वीसेक माणसं होतो तिथे पण कुणी कुणाशी बोलत नव्ह्तं. ते वातावरणच भारलेलं होत. तिथली भयाण शांतता वार्‍याच्या आवाजाने आणखीनच गंभीर होत चालली होती. तिथून थोड्या अंतरावर काही बायका शंख, शिंपल्यांनी बनवलेल्या वस्तू विकत होत्या. काही माणसं मासेमारीसाठी जाळं विणत बसली होती. झावळ्या आणि तराट्यांनी बांधलेली काही साधी झोपडीवजा घरं द्दृष्टीस पडली. तिथे लहान पोरं खेळत होती. अशा ठिकाणी राहणार्‍या लोकांचं कौतुकमिश्रीत आश्चर्य वाटत होतं. ते ठिकाण एक दु:खद भूतकाळ वागवत असल्यासारखं दिसत होतं. 'Ghost Town' हे नाव अगदी सार्थ ठरवणारं...

     अंधार पसरत चालला होता. मला परत मागे फिरून श्रीलंकेचे दिवे पाहायची इच्छा झाली पण ते शक्य नव्हतं. ट्रक पुन्हा सुरु झाला. या गावाची ही अवस्था त्सुनामीमुळेच झाली असणार या आमच्या गैरसमजाला एका काकांनी दूर केलं. त्यांनी सांगितलं की धनुषकोडी पूर्वी व्यापारी केंद्र म्हणून प्रसिध्द होतं. १९६४ सालच्या चक्रीवादळात उध्वस्त झालं ते परत उभं राहिलंच नाही... त्सुनामी आली तेव्हा नुकसान व्हावं असं काही तिथे उरलंच नव्ह्तं. त्या ठिकाणी आधी मोठ्ठं रेल्वे स्टेशन होतं. रामेश्वरमच्याही आधीचं. ’बोट मेल’ नावाची रेल्वे एगमोरहून यायची. नावेच्या आकाराचे डब्बे चक्क समुद्रात उतरवले जायचे! तिथपर्यंत रेल्वे असणारी ’बोट मेल’ नंतर बोटीसारखीच समुद्रातून सिलोनला जायची... काकांनी बरीच माहिती पुरवली. आम्ही थक्क झालो. अब्दुल कलामांच्या या जन्मगावाने एकेकाळी एवढं ऐश्वर्य उपभोगलंय यावर विश्वास ठेवणं जड जात होतं. या विचारांच्या तंद्रीत आम्ही चेकपोस्टपाशी कधी उतरलो हे नीटसं कळलंच नाही. रामेश्वरमला जाणार्‍या बसमध्ये बसलो. खिडकीतून दिसत होती ती पांढरा प्रकाश फेकणारी ट्युबलाईट. संपूर्ण प्रवासातला तो एकमेव कृत्रिम दिवा होता आणि तोसुध्दा  जनरेटरच्या मदतीनं जळत होता. बस निघाली पण त्या भुताच्या  गावानं आम्हांला पुरतं पछाडलं होतं...

Picture 146 [50%]

(क्रमश:)

Wednesday, December 22, 2010

अबाउट एली (About Elly / Darbareye Elly)

images

        कल्पना करा की आपण आपल्या मित्र मैत्रीणींबरोबर एका सहलीला आलो आहोत. आपल्या group मध्ये एक आमंत्रित व्यक्ती आहे जी कोण्या एकाच्या ओळखीची आहे. ती व्यक्ती group मधल्या इतर कोणालाही ओळखत नाही. हळूहळू ती व्यक्ती आपल्यात मिसळू लागते, तिला बोलवण्यामागचं कारण समजल्यावर आपण सुद्धा तिच्याशी मोकळेपणाने वागू लागतो, ती आपल्यापैकीच एक बनून जाते. एक दिवस उलटून जातो, सर्वकाही व्यवस्थित सुरु असतानाच अचानक ती व्यक्ती गायब होते... कुणालाही तिच्याबद्दल काहीही माहिती नसतं. आपण तिला शोधण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतो पण व्यर्थ! यादरम्यान त्या व्यक्तीबाबतच्या अनेक बाबी प्रकाशात येत जातात ज्यामुळे सारेच अचंबित होतात. सुरुवातीला आपलेपणाने, जीवाच्या आकांताने त्या व्यक्तीचा शोध घेणारे आपण नंतर केवळ एका त्रयस्थ दृष्टीकोनातून, आपल्या मागे पोलीसांचा ससेमिरा लागू नये या भावनेतून शोध मोहीम सुरु ठेवतो... या साऱ्या घटनाक्रमात सर्वांत जास्त मानसिक कुचंबणा होते त्याची ज्याने या व्यक्तीला आमंत्रित केलेलं असतं... ती सापडत नसल्याचं दु:ख आणि आपल्यामुळे बाकीच्यांना झालेला त्रास यामुळे ती कोलमडून गेलेली असते. शेवटी आपण विचार केलेल्या अनेक शक्यतांपैकी एक खरी ठरते आणि त्या व्यक्तीचा शोध घेणे संपते...

       इराणी दिग्दर्शक असघर फरहादी यांचा 'About Elly' (Darbareye Elly) हा चित्रपट आपल्याला अशाच एका सहलीवर घेऊन जातो, आपणही नकळत त्या सहलीचा एक भाग बनून आपल्या शक्यतांच्या कसोटीवर Elly ला शोधत राहतो. तीन इराणी जोडपे (सेपीदा-आमीर, शोहरे-पेमन, नाझी-मनूचेहेर), त्यांची तीन मुले, जर्मनीहून परतलेला एक घटस्फोटीत मित्र (अहमद), सेपीदाच्या मुलीला शिकवणारी शिक्षिका (एली) आणि स्वतःला एलीचा भाऊ म्हणवणारा अलीरझा या व्यक्तीरेखांभोवती ही कथा फिरते. सुरुवातीला काही वेळ बोगद्यातून जाणारी कार आणि तीत ओरडणारी मुलं, बायका दिसत राहतात. एके ठिकाणी थांबल्यावर सेपिदा बाकीच्यांना एलीची ओळख करून देते. अहमद आणि एलीने एकमेकांना पसंद करावं असा तिचा हेतू असतो, इतर सारेजण मग याच दृष्टीने प्रयत्न करताना दिसतात. त्यांनी बुक केलेलं कॉटेज, त्याचा मालक परत येत असल्यामुळे त्यांना मिळत नाही. शेवटी कॅस्पिअन समुद्राच्या काठी एका साध्या घरात ते राहायचं ठरवतात. बुक केलेलं कॉटेज न मिळाल्यामुळे त्यांचं चिडणं, समुद्रकाठचं घर बघून मुलांच्या काळजीने नवऱ्यावर चिडणारी बायको, मिळालेल्या घराची साफसफाई, रात्रीच्या जेवणाची भांडी दुसऱ्या दिवशी सकाळीच धुऊन टाकू असं बायकांचं एकमेकांना सांगणं त्याचवेळी बाहेर व्हरांड्यात पुरुष मंडळींचं हुक्का पिणं, पत्ते खेळणं या लहानसहान बाबी इतक्या सहजतेने दाखवल्या गेल्यात की हे सारं आपल्याच अवतीभवती चालत असल्यासारखं वाटावं. रात्री dumb charades खेळत असताना आपणही त्यांच्याबरोबर अंदाज बांधू लागतो तेव्हा तर याची खात्रीच पटते.

images1

       दुसऱ्या दिवशी सकाळीच एलीला परत जायचं असतं कारण एलीने तिच्या आईला ती मैत्रीणीबरोबर एक दिवस बाहेर जात आहे असं खोटंच सांगितलेलं असतं आणि सेपिदाला त्याची कल्पना असते तरीही सर्वजण तिला थांबायचा आग्रह करतात आणि नाईलाजाने तिला थांबावं लागतं... बाहेर पुरुषमंडळी Sand Volleyball खेळत असतात, एली समुद्राकाठी खेळणाऱ्या लहान मुलांवर लक्ष ठेवत असते,  बायका आपापली कामं करत असतात... तेवढ्यात एक लहान मुलगी रडत रडत आशर पाण्यात पडल्याचं सांगते. घरातलं वातावरण एकदम बदलतं. सारेजण त्याला वाचविण्यासाठी समुद्राकडे धाव घेतात, मदतीला आजूबाजूची काही तरुण पोरं येतात. समुद्राबरोबर वाहत जाणाऱ्या आशरला वाचवण्यात यश येतं पण... या लहान मुलांकडे लक्ष ठेवणारी एली? ती कुठे असते? आधीच थकलेले लोक तिच्या शोधासाठी परत समुद्रात जातात, एक बोट, पाणबुडे यांच्या मदतीने शोधमोहीम सुरु होते पण ती सापडत नाही. यानंतर सुरु होतो शक्याशक्यतांचा खेळ... ती नक्की कुठे गेली? समुद्रात वाहून गेली की कुणालाही न सांगता निघून गेली की कुठे बाहेर गेली... कुणालाच माहिती नसतं. छोट्या मुलीने तिला आशर पाण्यात पडेपर्यंत किनाऱ्यावरच उभी असल्याचं पाहिलं असतं. घरात जेव्हा तिची बॅग आणि मोबाईल सापडत नाही तेव्हा ती न सांगता निघून गेली असेल असं सर्वांना वाटतं पण सेपिदा एलीची तिने लपवून ठेवलेली बॅग त्यांना दाखवते(त्यातच तिला मोबाईल असतो) आणि क्षणभरापूर्वीचा आशेचा किरण लगेचच दिसेनासा होतो.

       यानंतर एकेक सत्य बाहेर येत जातं आणि एलीबद्दल वाटणारा आपलेपणा तिरस्कारात बदलू लागतो, तिला शोधण्यापेक्षा पोलिसांपासून कसं दूर राहायचं याचा विचार ते करू लागतात कारण ती जिवंत असण्याची आशा ते सोडून देतात. अखेर एलीचा भाऊ अलीरझाला बोलावण्यात येतं आणि शेवटचं भयंकर सत्य समोर येतं...

       वरकरणी पाहता ही रहस्यकथा वाटते आणि काहीअंशी ती आहेही परंतू चित्रपटाचा बाज रहस्यपटाकडे झुकणारा अजिबात नाही. त्यात पूर्णपणे भर दिल्या गेलाय तो भावनिक नात्यांवर आणि गुंतागुंतीवर. आतापर्यंत पाहिलेल्या इराणी चित्रपटांचं एक वैशिट्य जाणवतं की त्यात कृत्रिमपणाचा लवलेशही नव्हता त्यामुळे आपण चित्रपटाशी बांधले जातो. संपूर्ण चित्रपटात एकदाही पार्श्वसंगीत वापरलेलं नाही. अगदी आरश आणि एलीचा समुद्रात शोध सुरु असतानाच्या दृश्यातही समुद्राच्या लाटांशिवाय इतर कोणतंही संगीत नाही यामुळे समोरचं दृश्य अधिक परिणामकारक ठरतं. या चित्रपटातील काही scenes प्रत्यक्ष बघायलाच हवेत जसे एली लहान मुलांशी किनाऱ्यावर खेळत असते ते दृश्य, एलीची ब्याग दिसत नाही म्हणल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर झळकलेलं क्षणिक समाधान (a ray of hope हा चपखल बसणारा शब्द), एलीच्या एकाएकी नाहीशी होण्याबद्दलचे सर्वांचे तर्कवितर्क, सेपिदावर चिडून तिला मारहाण करणारा तिचा नवरा, "कुणी काहीही विचारलं तरी आम्हांला माहिती नाही असे सांगा" म्हणणारे आणि त्याची मुलांकडून practice करवून घेणारे आई-बाबा, एलीबद्दलची सत्ये उलगडत असतांनाची अह्मदची स्थिती, एलीच्या मृत्यूनंतर तरी तिच्याबद्दल खोटे बोलू नये असे वाटणारी सेपिदा आणि तिच्या खोटे न बोलल्यामुळे बाकीचे कसे अडचणीत येतील हे पटवून सांगणारे इतर, या मानसिक द्वंद्वात शेवटी असहाय्य होऊन रडणारी आणि अखेर खोटं बोलणारी सेपिदा...

       हा चित्रपट संपल्यावर काही गोष्टी प्रामुख्याने लक्षात राहतात: दिग्दर्शन, निर्माण, कथा, पटकथा, वेशभूषा अशा विविध कामगिरी एकहाती पार पाडणारे असघर फरहादी, सेपिदाची भूमिका करणारी गोलशिफ्तेह फराहनी (Golshifteh Farahani), चित्रपटाची श्रेयनामावली दिसत असताना ऐकू येणारं वायोलिन... 'Song for Eli' ही Andrea Bauer ची वायोलिनवरची धून. चित्रपटाइतकाच खोल परिणाम हे instrumental करतं. संपूर्ण चित्रपट सलग पाहिला असल्यास याचा अनुभव नक्कीच येईल. या चित्रपटाच्या कथेचा विचार करता याचं नाव 'About Elly' पेक्षा 'About a Lie' ठेवावं असही काहीजणांनी सुचवलं होतं. या चित्रपटाबाबत फरहादी म्हणतात, "A film must open a space in which the public can involve themselves in a personal reflection, and evolve from consumers to independent thinkers. Cinema has no other choice but to take up this approach, as I did when I made 'About Elly' ". हा चित्रपट या कसोटीवर नक्कीच उत्तीर्ण होतो!

13675-about-elly

Tuesday, December 21, 2010

शोध तक्षकाचा...

काही वर्षांपूर्वी काका आणि दादाची कुठल्यातरी विषय़ावर चर्चा सुरु होती, त्यात तक्षकाचा विषय निघाला तेव्हा काकांनी त्याची गोष्ट थोडक्यात सांगितली, म्हणजे वडिलांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या तक्षकावर जनमेजयाने उगवलेला सूड, सर्पयज्ञ, इ. त्यावेळी ’तक्षक’ चित्रपटाची कथा काहीशी अशीच असल्याचं दादाला आठवलं. ती चर्चा वेगवेगळी वळणे घेत पुढे जात राहिली पण माझ्या मनात रेंगाळत राहिला तो तक्षक आणि त्यावर बेतलेला (निदान नावापुरता) सिनेमा. जेव्हा बुद्धीला जरा ताण देण्याचा प्रयत्न केला तेव्हा तक्षक आणि परीक्षितची गोष्ट लहान असताना बालचित्रवाणीमध्ये पाहिल्याचं स्मरत होतं. कोणी एक व्यक्ती स्वतःला फळामध्ये बदलतो आणि राजमहालात घुसताच तो साप बनून राजाला डसतो, राजा मरतो, वगैरे. पण नीट संगती लागत नव्हती. पुढे कालौघात त्या तक्षकाची गोष्ट, तो सिनेमा मेंदूतल्या एका अडगळीच्या जागी पडला... परंतू गाढ झोपलेला मनुष्य चेहऱ्यावर गार पाण्याचा शिपका पडताच ताडकन उठावा तसं काहीसं झालं. परवा T.V. बघत असताना कुठल्याशा वाहिनीवर coming up : Thakshak असं दिसलं आणि मेंदूत खोलवर रुतलेल्या आठवणी परत फिरून एकत्र आल्या. अचानक एखादी छोटीशी घटना मेंदूत साठवलेल्या अनेक सुप्त आठवणी जागी करते. 'coming up' ची ओळ त्यासाठी perfect निमित्त होतं.
मागच्या वेळी अपूर्ण राहिलेली किंबहुना सुरूच न केलेली शोधयात्रा यावेळी पूर्ण करायचीच या निर्धाराने संपूर्ण सिनेमा पहायचं ठरवलं. गोविंद निहलानींचा चित्रपट म्हणल्यावर seriously बघणं आलंच. सिनेमाचं नाव ’तक्षक’ ठेवण्यामागे काहीतरी कारण नक्कीच असेल असं वाटलं. आजकालच्या तद्दन करमणूकप्रधान हिंदी चित्रपट पाहता हे शितावरून भाताची परीक्षा करण्यासारखं होतं. पण निहलानींचा सिनेमा म्हटल्यावर तेवढी risk घेता येते! त्यांचा पहिलाच व्यावसायिक चित्रपट अशी प्रसिद्धीही मिळालेली होती, तेव्हा हा सिनेमा पूर्ण पहिला. सिनेमा चांगला होता. अमरीश पुरी, अजय देवगण, तब्बू सर्वांचाच अभिनय सुंदर होता. नाही म्हणायला राहूल बोस negative रोल मध्ये जरासा खटकला. त्याची संवादफेक, चेहऱ्यावरचे हावभाव.. बात कुछ हजम नाही हुई! बाकी रेहमानचं संगीत उत्कृष्ट होतं.
शोधयात्रेतला एक टप्पा तर पूर्ण झाला होता, आता राहिली होती ती महाभारतातली तक्षकाची गोष्ट. या गोष्टीत प्रामुख्याने येतात ती पुढील पात्रे: १.परीक्षित २.कली ३.शमीक ऋषी ४.शृंगी ५.तक्षक ६.कश्यप ऋषी ७.जेनमेजय ८.आस्तिक. थोडक्यात गोष्ट अशी की, कलीच्या प्रभावामुळे परीक्षित राजा, साधनेत मग्न असलेल्या शमीक ऋषीच्या गळ्यात मेलेला साप टाकतो. ते पाहून ऋषींचा मुलगा शृंगी राजाला सात दिवसांत साप चावून मृत्यू येण्याचा श्राप देतो. त्यासाठी पांडवांनी (व परीक्षितनेसुद्धा) पराभव केलेल्या नागवंशीय राजा तक्षकाची निवड करण्यात येते. सातव्या दिवशी राजाला डसण्यासाठी जाणाऱ्या तक्षकाला, वाटेत, सापाच्या विषावर उतारा म्हणून प्रतिविष घेऊन जाणारे कश्यप ऋषी भेटतात. प्रतीविषाचा परिणाम बघून तक्षक घाबरतो आणि कश्यप ऋषींना भरपूर दक्षिणा देऊन परत पाठवतो. राजमहालात घुसण्यासाठी तक्षक एका फळाचं रूप घेतो आणि राजाजवळ जाताच आपल्या मूळ रुपात येऊन राजाला डसतो आणि राजा मरतो. ही गोष्ट जनमेजयाला कळल्यावर तो संपूर्ण नाग जातीचाच विनाश करण्यासाठी सर्प यज्ञ सुरु करतो. त्यात असंख्य नागांचा बळी गेल्यावर जेव्हा तक्षकाची आहूती द्यायची वेळ येते तेव्हा आस्तिक नावाचा मुलगा राजाकडून मिळालेल्या वचनाचा फायदा घेत तक्षकाचे प्राण वाचवतो. अशी ही तक्षकाची एकंदरीत गोष्ट! संपूर्ण कथा बरीच मोठी आणि तपशिलांनी भरलेली आहे. परंतू ती सलग इंटरनेट वर सापडत नाही, त्यासाठी पुस्तकांचा आधार घ्यावा लागतो.
सिनेमा आणि या गोष्टीत फक्त एकच साम्य होतं ते म्हणजे वडिलांच्या खूनाचा मुलाने घेतलेला बदला! यानंतर चित्रपटाचं नाव”तक्षक’ का ठेवलं असावं हा प्रश्न मला छळू लागला. वास्तविक ’तक्षक’ म्हणजे संरक्षक किंवा एका नागाचे नाव एवढाच अर्थ त्यात होता. या प्रश्नाचं उत्तर शोधून मानसिक सामाधानाशिवाय काहीही हाती लागणार नव्हतं पण काही प्रश्न कितीही शु:ल्लक असले तरीही त्याचं उत्तर मिळेपर्यंत मनाला चैन पडत नाही. एखाद्या गाण्याची धून ऐकताना ते संगीत ओळखीचं वाटतं, धून ऐकल्यासारखी वाटते, ते गाणंही आधी ऐकलेलं असतं परंतू ऐनवेळी त्या गाण्याचे बोल आठवत नाहीत. ओठांवर असतात पण बाहेर येत नाहीत. अशावेळी जी अस्वस्थता आपल्याला घेरते तसंच काहीसं माझ्याबाबतीत होत होतं. मी इंटरनेटवर बराच शोध घेतला आणि मला एका भल्या पत्रकाराने घेतलेली खुद्द गोविंद निहलानींचीच मुलाखत सापडली. आत सर्व प्रश्नांची उत्तरे सापडणार या आनंदाने मी लगेच ती वाचायला घेतली. त्यात शेवटचा प्रश्न होता: What is the meaning of Thakshak? यावर निहलानींनी दिलेलं उत्तर होतं, "तक्षक हा महाभारतात उल्लेख असलेला एक नाग होता परंतू या चित्रपटाची कथा आणि तक्षकाची गोष्ट यांत काहीही संबंध नाही!"
त्या एका उत्तराने सारं काही स्वच्छ झालं. या सर्वांत खरंतर माझा भ्रमनिरास झाला होता कारण त्या दोन गोष्टींची संगती मी शोधत होतो आणि त्यासाठीच शोधयात्रा आरंभिली होती. परंतू तशी संगती कुठेच नव्हती. आधी वाटल्याप्रमाणे ते केवळ नामसाधर्म्यच होतं. पण नंतर आठवलं ते या छोटेखानी शोधयात्रेने दिलेलं मानसिक समाधान, तक्षकाची संपूर्ण गोष्ट समजून घेण्यातला आनंद, या गोष्टीसंबंधी आज अस्तित्वात असलेल्या ठिकाणांना (टॅक्सीला(तक्षशिला), परीक्षितगड, परीक्षित कुंड, उत्तर प्रदेशातलं मैनपुरी गाव)प्रत्यक्षात भेट देण्याची ईच्छा, या ठिकाणांसंबंधी असलेल्या आख्यायिका... सारंच अद्भूत होतं... 'मनावर' घेतलेली कोणतीही कामगिरी आपण किती कार्यक्षमतेने पार पाडतो! असाच जर प्रत्येक प्रश्न सोडवता आला तर जगणं जरासं सोप्पं आणि आनंदी नक्कीच करता येईल...
एक प्रश्न मात्र अजून सुटला नाहीये. 'तक्षक' असं छान नाव असताना, सिनेमाचं नाव 'थक्षक' (Thakshak) असं का ठेवलं असावं?